अहिल्यानगर पोलीस दलातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात, ‘एसीबी’ ने रंगेहाथ पकडले



अहिल्यानगर - शनि शिंगणापूर येथील शनि मंदिरासमोरील गाळामालकाकडून २ हजार रुपयांची लाच घेताना शिंगणापूर पोलीस ठाण्याचा पोलिस कर्मचारी अजय कृष्णा ठुबे (वय ३९) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. 

शिंगणापूर येथे पुजा साहित्याची खरेदी करता भाविकांची वाहने ठराविक दुकानात लावण्यासाठी दोन महिन्यांचे मिळून तीन हजारांची मागणी या पोलीस कर्मचार्‍याने तक्रारदार गाळा मालकाकडे केली होती. याबाबत तक्रारदार गाळा मालकाने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून पथकाने १६ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलिस कर्मचारी ठुबे याने लाचेची मागणी करत ती न दिल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या ग्रहराज नारळ सेंटरचे पार्किंग मध्ये तक्रारदार व पोलिस ठुबे यांच्यात ही चर्चा झाली आणि त्याने ३ हजार पैकी २ हजार लगेच आणि १ हजार नंतर स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदार हे ठुबे याला दोन हजार रुपये देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले.

याबाबत पोलिस कर्मचारी अजय ठुबे याच्या वर शनि शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अहिल्यानगर येथील पो.नि. राजू अल्हाट यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments