छत्रपती संभाजीनगर: संपूर्ण राज्यभरात एक आंदोलक म्हणून समोर आलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे यांना जिल्हा परिषद निवडणुकीतही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. मराठा आंदोलनापासून सक्रिय असलेले मंगेश साबळे हे जितके जिल्ह्यात चर्चेत असतात तितकेच ते हटके आंदोलनांमुळे मराठवाड्यासह राज्यात चर्चेत असतात. साबळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली आणि आता जिल्हा परिषद निवडणूक लढवली. माजी मंत्री आणि शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. मात्र साबळे यांना पुन्हा एकदा अपयश आलं आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुद्द्यावर नेहमी एक आगळे वेगळे आंदोलन करणाऱ्या मंगेश साबळे यांना या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यश येईल, असं माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना वाटत होतं. त्याच मुद्द्यावर मंगेश साबळे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि मोठ्या जोमाने त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगरमधील वडोद बाजार सर्कलमधून त्यांनी शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेत निवडणूक रिंगणात उडी मारली. प्रचाराला सुरुवात झाली, मात्र यावेळी मित्रपक्षाचेच उमेदवार त्यांच्याविरोधात उभे होते. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपाल वाघ हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विजयी झाले आहेत.
वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमध्ये ही निवडणूक मोठी चुरशीची ठरली होती. कारण या परिसरात जेवढी क्रेझ मंगेश साबळे यांची आहे तेवढीच क्रेझ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व आता विजयी झालेले गोपाल वाघ यांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वात विकासाचा मुद्दा समोर ठेवत वाघ यांनी जनतेच्या दारोदारी जाऊन मतं मागितली आणि त्यांचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला. तर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी डोळ्यासमोर ठेवत सरपंच मंगेश साबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन मंगेश साबळे यांनी वडोद बाजार परिसरात व संपूर्ण जिल्हा परिषद सर्कलमध्ये फिरून आपला प्रचार केला होता. मात्र या निवडणुकीत त्यांचा 1 हजार 150 मतांनी पराभव झाला.

Post a Comment