अहिल्यानगर - नगर जवळ झालेल्या ४ वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील ३ अपघात नगर पुणे महामार्गावर तर एक अपघात कल्याण रोड वर झाला आहे. विशेष म्हणजे यातील ३ अपघात एकाच दिवशी ८ मार्च रोजी तर एक अपघात ७ मार्च रोजी सायंकाळी झाला आहे.
पहिला अपघात नगर पुणे रोडवर पवारवाडी घाटाजवळ असलेल्या दौलत पेट्रोल पंपा समोर ७ मार्च रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास घडला. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सागर धोंडीबा गुंड (वय ३१, रा. निंबोडी, ता.नगर) हा गंभीर जखमी होवून मयत झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्यास उपचारासाठी सुपा येथील रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सागर याच्या पश्चात आई, पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे.
दुसरा अपघात ८ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नगर पुणे रोड वर चास (ता.नगर) गावच्या शिवारात शेल पेट्रोल पंपाजवळ झाला. पुण्याहून नगरच्या दिशेने मोटारसायकल वर येत असलेल्या प्रवीण आप्पासाहेब बेंद्रे (वय २५, रा. ममदापूर, ता.राहाता) यास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो रस्त्यावर पडून त्याच्या डोक्याला मार लागला. मोठा रक्तस्राव होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसरा अपघात नगर पुणे रोडवरच चास शिवारात असलेल्या हॉटेल माथेरान समोर सायंकाळी ७.३० च्या सुमारास झाला. रस्ता ओलांडत असलेल्या संदीप सुरेश चव्हाण (वय ३६, रा. मांजरी, पुणे) यांना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नगर कल्याण रोड वर नेप्ती फाटा (ता.नगर) येथे मोपेड ला भरधाव वेगातील आयशर टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोपेड स्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ८ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. या मध्ये सौ. ऐश्वर्या सिद्धांत वाकचौरे (वय ३०, रा. नेप्तीनाका, नालेगाव) यांचा मृत्यू झाला आहे.
मयत वाकचौरे या मोपेड वर नगर कल्याण रोडने नगर कडे येत असताना भरधाव वेगातील आयशर टेम्पोने त्यांच्या मोपेड ला जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत ऐश्वर्या वाकचौरे यांच्यावर नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.
हे ही वाचा ...
टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर बॉलीवुड अभिनेत्यांकडून हटके अभिनंदन

Post a Comment