अहिल्यानगर - शहरातील बोल्हेगाव परिसरात रात्रीच्या वेळी नियमांची पायमल्ली करून डीजे चा दणदणाट करणे नवरदेवासह चालकाला अंगलट आले आहे. जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश झुगारून वरात काढल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच थेट नवरदेवासह डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नाईक रवींद्र तुकाराम धुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ मार्च रोजी रात्री बोल्हेगाव येथील आंबेडकर चौकात नवरदेव सोनु उर्फ संदेश राजेंद्र गायकवाड याची वरात निघाली होती. यावेळी मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याने ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवले गेले. गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाने डीजे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, नवरदेव सोनु उर्फ संदेश राजेंद्र गायकवाड (रा.रेणुकानगर, बोल्हेगाव) आणि डीजे चालक गणेश बाळासाहेब कोलते (रा. बोल्हेगाव)यांनी पोलिसांच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
ध्वनी तीव्रता मोजमाप यंत्राद्वारे तपासणी केली असता आवाजाची पातळी ८२.४ डेसिबल इतकी आढळून आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे ही वाचा ...
टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर बॉलीवुड अभिनेत्यांकडून हटके अभिनंदन

Post a Comment