अहिल्यानगर -अहिल्यानगर शहराजवळील वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील रहिवासी आणि माजी सैनिक लक्ष्मण बन्सी गव्हाणे (वय ४३ ) यांचा ठाणे येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वडगाव गुप्ता परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लक्ष्मण गव्हाणे यांनी तब्बल २२ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावून देशसेवा केली होती. गतवर्षी ते सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला होता. या भरती प्रक्रियेसाठी ते आपल्या मित्र प्रमोद प्रकाश शेवाळे यांच्यासोबत ४ मार्च रोजी मुंबईला गेले होते. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत दोघांचीही निवडही झाली होती. ही आनंदाची बातमी कुटुंबीयांना सांगून त्यांची भेट घेण्याची त्यांची आतुरता होती.
मुंबईहून परतताना ते लोकल ट्रेनने कल्याणपर्यंत येत होते. दरम्यान, ठाणे स्थानकावर ट्रेन आल्यानंतर ती कार शेडमध्ये गेली याची कल्पना दोघांनाही नव्हती. प्लॅटफॉर्म नसल्याने रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर गव्हाणे यांना तातडीने उपचारांची गरज होती. मात्र ॲम्बुलन्सला कॉल करूनही ती वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे योग्य वेळी उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. लक्ष्मण गव्हाणे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. देशसेवा केलेल्या माजी सैनिकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Post a Comment