अहिल्यानगर - मढी ते पाथर्डी मार्गावरील मढी घाटात सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या टोळीतील ४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांचे काही साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
जिल्ह्यात दरोडा, घरफोडी आणि रोड रॉबरीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला नियमित गस्त करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विजय पवार, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ व चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करून गस्तीसाठी रवाना केले होते.
सदर पथक ७ मार्च रोजी पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत मढी यात्रेच्या बंदोबस्तादरम्यान पथक गस्त करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, आकाश मोहन डुकरे व विकास दत्तू म्हस्के हे त्यांच्या अन्य साथीदारांसह मढी ते पाथर्डी मार्गावरील मढी घाटात थांबून सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी रस्त्याच्या कडेला अंधारात काही इसम हातात हत्यारे घेऊन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले, तर इतर काही जण पळून गेले.
आकाश मोहन डुकरे (वय २६, रा. विजयनगर, पाथर्डी), विकास उर्फ सुनील दत्तू म्हस्के (वय २५, रा. माणिक दौंडी चौक, पाथर्डी), आदित्य दीपक बोरकर (वय २३, रा. तनपुरे गल्ली, राहुरी) आणि शरद श्रीरंग जाधव (वय ४०, रा. वागल खेडा, ता. अंबड, जि. जालना) अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल व एक स्क्रू ड्रायव्हर असा सुमारे १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या टोळीतील प्रमुख आकाश डुकरे याच्याविरूध्द अहिल्यानगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच विकास म्हस्के व आदित्य बोरकर यांच्याविरूध्दही विविध पोलीस ठाण्यांत दरोडा व चोरीसंबंधी गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा ...
टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर बॉलीवुड अभिनेत्यांकडून हटके अभिनंदन

Post a Comment