नगर तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली, घातक हत्यारे जप्त

 


अहिल्यानगर - तलवार, सत्तूर, मिरची पूड, लोखंडी कटावणी घेवून दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील मदडगाव शिवारात पकडले आहे. तर त्यांचे अन्य ३ साथीदार अंधाराचा फायदा घेवून पसार झाले आहेत. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी हत्यारे जप्त केली आहेत. १० मार्च रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली.

छगन चिंतामण काळे (वय ४३, रा. तळेवस्ती, कडा, ता.आष्टी, जि.बीड), महावीर पंढरीनाथ भोसले (वय ३९, रा. शेरी खुर्द, ता. आष्टी जि. बीड), कदम चिंचावन काळे (वय ३५, रा. तळेवस्ती कडा, ता. आष्टी, जि.बीड), इदगर गारमन चव्हाण (वय ३८, रा. शेरी खुर्द, ता. आष्टी जि. बीड) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रविण हबाजी भोसले, प्रफुल्ल हबाजी भोसले (दोघे रा. पिंपरखेड ता. आष्टी जि.बीड), संतोष उर्फ सिंधुशा सुर्यभान काळे रा. गंगापुर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीगनर) हे तिघे जण फरार झाले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, लक्ष्मण खोकले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, सुनिल मालणकर यांचे पथक १० मार्च रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, ६ ते ७ इसम दोन मोटार सायकलवर येवुन मदडगाव गावचे शिवारातील टाकळी काझी ते अंमळनेर जाणारे रोडवर थांबुन सशस्त्र दोरडा घालण्याचे तयारीत आहेत.  

ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ मदडगाव कडे धाव घेतली. तेथे पाण्याचे टाकीजवळ अंधारात काही इसम संशयीतरित्या हातामध्ये हत्यारे घेवुन उभे असल्याचे दिसुन आले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन चार जणांना पकडले. या गडबडीत तिघे अंधारात पसार झाले. पकडलेल्या आरोपींकडून एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी सत्तुर, एक तलवार, मिरची पुड, ३ मोबाईल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या आरोपींच्या विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(), ३१०(), सह आर्म अक्ट ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

0/Post a Comment/Comments