अहिल्यानगर - दौंड ते मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत त्यांची कुठलीही परवानगी न घेता तसेच सदर जमीन रेल्वे प्रशासनाने संपादित केलेली नसतानाही मोठ्या प्रमाणावर डबर, मुरूम, दगडाचे ढिगारे टाकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करायला अडथळा येत असून त्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बेकायदेशीर ताबेमारी बाबत तहसील कार्यालयात अनेकदा तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी संतप्त व अस्वस्थ झाले आहेत.
घोसपुरी येथील गट नं. ४७६ व ४७८ शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या सुमारे १५ ते २० एकर क्षेत्रात शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता ठेकेदाराने रेल्वे कामासाठी डबर, मुरूम, दगड यांचे मोठ मोठे ढिगारे घातले आहेत. त्यामुळे या शेतजमिनीचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना तेथे कुठलेही पिक घेता येत नाही. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केल्यावर हे रेल्वेचे काम आहे, यात अडथळे आणले तर जमिनीचा मोबदला तर भेटणार नाहीच उलट तुम्हाला कायदेशीर अडचणी निर्माण होतील अशी भीती दाखवली गेली.
त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तुम्हाला या शेतजमिनीचा चांगला मोबदला मिळणार असल्याच्या थापा मारल्या. मात्र रेल्वे प्रशासनाने आजपर्यंत सदर जमीन संपादित केलेली नाही किंवा शेतकऱ्यांना भुसंपादनाबाबत कोणत्याही नोटीसा दिलेल्या नाहीत. काही शेतकऱ्यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर शेत जमीन संपादित करण्याचे रेल्वेचे कुठलेही प्रयोजन नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांना वेड्यात काढल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्याच शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेवून बनावट रिपोर्ट
संबंधित ठेकेदाराने डबर, मुरूम, दगडाचे ढिगारे हे गट नं. ४७६ व ४७८ शेतजमिनीत टाकलेले आहेत, मात्र या गटात ज्यांची शेती आहे, त्या शेतकऱ्यांच्या ऐवजी इतर गटातील दुसऱ्याच शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेवून बनावट रिपोर्ट सादर केल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्यांनी केला आहे. मंडलाधिकारी चास यांनी ही कुठलीही पडताळणी न करता आर्थिक हितसंबंधातुन चुकीचा रिपोर्ट सादर केला असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
तहसीलदारांकडून न्याय मिळेना जिल्हाधिकाऱ्यांनी तरी द्यावा
याबाबत शेतकरी मिठू आनंदा झरेकर यांनी २ वर्षापूर्वी १ जुलै २०२४ रोजी तहसीलदार, नगर यांच्या कडे प्रथम तक्रार केली होती. त्या तक्रारीची तहसीलदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यानंतर पुन्हा २२ डिसेंबर २०२५ रोजी तक्रार केलेली आहे. परंतु त्या तक्रारीची ही दखल घेण्यात आलेली नाही. माझ्या मालकीच्या शेतात या ठेकेदाराने मोठ मोठे ढिगारे टाकून शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे. पूर्ण शेती नापीक झाली आहे.
या प्रकारची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होवून संबंधित ढिगारे त्या ठेकेदाराला तातडीने उचलण्यास सांगून मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तहसीलदार व तालुका प्रशासन आम्हाला न्याय देत नसल्याने यामागे असलेल्या त्यांच्या हेतूची चौकशी करण्यात यावी व प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांनी या मध्ये लक्ष घालून आम्हा गोरगरिबांना न्याय द्यावा अशी मागणी या गटातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment