डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, सायबर पोलिसांनी केला गुन्हा दाखल


अहिल्यानगर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील रामजी सपकाळ यांच्याबद्दल फेसबुकवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामाजिक भावना दुखावल्या गेल्याने संबंधित फेसबुक खातेधारकावर नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावेडी येथील वसंत विहार भागात राहणारे योगेश रघुनाथ साठे हे ७ मार्च रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास फेसबुक पाहत होते. यावेळी विकास देवकर नावाच्या व्यक्तीच्या फेसबुक खात्यावरून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पोस्टमध्ये वापरलेली भाषा अत्यंत प्रक्षोभक आणि समाजात तेढ निर्माण करणारी होती. या प्रकारामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

याप्रकरणी योगेश साठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी फेसबुक खाते धारक विकास देवकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. समाजात अशांतता पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


 

0/Post a Comment/Comments