अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्ह्यातील चापडगाव (ता. कर्जत) शिवारात प्रतिबंधित अफूची शेती केली जात असल्याचे समोर आले असून, स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकत एका आरोपीला अटक केली आहे. तसेच या कारवाईत ४७ लाख ६४ हजार १८० रुपये किमतीची २३८.२३९ किलो वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची लागवड व विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी अंमली पदार्थ विक्री, सेवन व अफू लागवड करणार्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग तसेच पोलीस अंमलदार दिपक घाटकर, विजय पवार, अतुल लोटके, संतोष खैरे, अमृत आढाव, चालक उत्तरेश्वर मोराळे आणि अर्जुन बडे यांचे पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत माहिती घेत होते.
त्यावेळी परमेश्वर बन्सी घनवट (वय ६८, रा. चापडगाव ता. कर्जत) हा आपल्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफूच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना देण्यात आली. त्यांच्या सुचनेनुसार पथकाने कर्जत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या मदतीने कारवाई करण्याचे ठरविले. त्यानंतर पथक कर्जत पोलीस स्टेशन येथे जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना लेखी अहवाल दिला. त्यानंतर विजय झंजाड, पोलीस अंमलदार संजय सानप, किरण जाधव, सचिन थोरात यांच्या पथकासह चापडगाव शिवारातील शेती गट क्रमांक १३ येथे छापा टाकण्यात आला. तेथे एका इसमास शेतात राखण करताना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव परमेश्वर बन्सी घनवट (वय ६८, रा. चापडगाव ता. कर्जत) असे सांगितले.
चौकशी दरम्यान घनवट याने शेतात असलेले पीक अफूचे असून ते दोन ते तीन महिन्यांपूर्वी लावले असल्याची कबुली दिली. तसेच त्याला पाणी व खते देऊन त्याची जोपासना करत असल्याचेही सांगितले. पोलिसांनी शेतातून २३८.२३९ किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली. जप्त केलेल्या झाडांची अंदाजे किंमत ४७ लाख ६४ हजार १८० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शामसुंदर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५ कलम ८ (क) व १५ (क) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.

Post a Comment