शिक्षक नेत्याची नवी इनिंग, बाजार समितीच्या संचालकपदी झाली बिनविरोध निवड



पारनेर (प्रतिनिधी) - पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या संचालकपदावर महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे मार्गदर्शक व शिक्षकांचे नेते रा.या. औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाला संधी मिळाल्याने बाजार समितीत समाधान व्यक्त केले जात आहे.
बाजार समितीचे संचालक प्रशांत गायकवाड यांचे संचालकपद रद्द झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी प्रचलित सहकार कायद्यानुसार रिक्त जागेवर संचालकाची निवड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने सोमवार (९ मार्च) रोजी बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली. सभापती किसनराव रासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत औटी यांच्या नावावर एकमत झाले आणि त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
तरटे यांच्या प्रस्तावाला पाठिंबा

रिक्त जागेवर औटी यांची निवड करावी, असा ठराव बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी मांडला. या प्रस्तावाला उपस्थित सर्व संचालकांनी एकमुखी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे औटी यांची निवड बिनविरोध झाली. बैठकीस उपसभापती किसनराव सुपेकर, संचालक बापूसाहेब शिर्के, डॉ. आबासाहेब खोडदे, गंगाराम बेलकर, विजयराव पवार, अशोक कटारिया, संदीप सालके, शंकरराव नगरे, चंदन भळगट, तुकाराम चव्हाण, पद्मजा पठारे, मेघा रोकडे, बाबासाहेब नहे तसेच सचिव सुरेश आढाव उपस्थित होते.

निष्ठेला मिळाला राजकीय मान

रा.या. औटी गेल्या तीन दशकांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांवर आधारित राजकारण आणि समाजकारण करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव झावरे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. गेल्या सहा वर्षांपासून खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सक्रिय आहेत. बाजार समितीच्या संचालकपदाची संधी देत खासदार लंके यांनी औटी यांच्या दीर्घकालीन निष्ठेला न्याय दिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

सहकार क्षेत्रातील अनुभवाचा लाभ

रा.या. औटी यांना सहकार क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव आहे. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन, तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा बाजार समितीच्या कामकाजाला निश्चितच फायदा होईल. असे बाजार समिती सभापती किसनराव रासकर व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे म्हणाले.


0/Post a Comment/Comments