नगर पुणे महामार्गावर लुटमार करून मामाच्या शेतात लपून बसला पण शेवटी खेळ खल्लास...


अहिल्यानगर - नगर पुणे महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवत लुटमार तसेच खुनाचा प्रयत्न करणारा कुख्यात आरोपी भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) याला एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. तो निमगाव घाणा (ता. नगर) येथे मामाच्या शेतात लपून बसलेला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे स.पो.नि.माणिक चौधरी यांना भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे हा निमगाव घाणा परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स.पो.नि.चौधरी यांनी तत्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी सापळा रचून शेतात लपलेल्या आरोपीला शिताफीने पकडले.चौकशी दरम्यान आरोपी हा नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चोरी व घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे समोर आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.माणिक चौधरी, उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस अंमलदार राकेश खेडकर, सचिन आडबल, संदीप पवार, राजू सुद्रिक, नवनाथ दहिफळे, अक्षय रोहोकले, ज्ञानेश्वर आघाव, जयसिंग शिंदे, दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांच्या पथकाने केली.

 


0/Post a Comment/Comments