मुळा धरणात पोहताना अहिल्यानगरच्या तरुणाचा बुडून मृत्यू, एक जण बचावला


अहिल्यानगर - राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांमधील एकाचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. तर दुसर्‍या तरुणाला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.मयुर लाला कांबळे (वय २४, रा. बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहिल्यानगर येथील बालिकाश्रम रोड परिसरातील रहिवासी मयुर लाला कांबळे, नैतिक सोनटक्के, रोहित कांबळे, विनय खिस्ती आणि आकाश प्रभूने हे पाच मित्र ८ मार्च रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी मयुर कांबळे आणि नैतिक सोनटक्के या दोघांना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. ते दोघे चमेली गेस्ट हाऊसच्या पाठीमागील बाजूस पीर बाबा दर्गा जवळ धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र दोघांनाही व्यवस्थित पोहता येत नसल्यामुळे ते खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. घाबरून त्यांनी आरडाओरडा केला.

हा प्रकार लक्षात येताच परिसरातील अशोक गायकवाड, किशोर बर्डे, आमीन शेख, उमेश गंगे, रमेश निकम, संतोष गायकवाड, चांदभाई शेख, अंकुश बर्डे आदी युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या युवकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या मारून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी नैतिक सोनटक्के याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र मयुर लाला कांबळे हा तरुण पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मयुर कांबळे याचे नातेवाईक राहुरी येथे दाखल झाले. मयुरचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी मोठा हंबरडा फोडला. मयुरच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

हे ही वाचा ...

टी 20 वर्ल्डकप जिंकल्यावर बॉलीवुड अभिनेत्यांकडून हटके अभिनंदन 

 



0/Post a Comment/Comments