अहिल्यानगर - आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत. इंडस्ट्रियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अहिल्यानगर एमआयडीसी मधील तब्बल 300 उद्योगांचे चाके थांबले आहेत. त्यामुळे जवळपास 3 हजार कामगारांचे काम बंद पडण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्याने उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. एमआयडीसी परिसरातील अनेक उद्योगांमध्ये उत्पादनासाठी इंडस्ट्रियल गॅस अत्यावश्यक असतो. विशेषतः इलेक्ट्रिकल मोटार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये गॅसवर आधारित प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने मोटार तयार करण्याचे विभागच बंद पडले आहेत.
काही कंपन्यांमध्ये छोट्या प्रोजेक्टअंतर्गत सुमारे 700 मोटारी, तर मोठ्या कंपन्यांमध्ये 7 हजारांपर्यंत मोटारींचे उत्पादन केले जाते. पण गॅसच्या कमतरतेमुळे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाल्याने उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उद्योगांतील कामकाज थांबल्याने 3 हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने इंडस्ट्रियल गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी एमआयडीसी मधील उद्योजकांनी सरकारकडे केली आहे. उद्योगांची चाके थांबल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हॉटेल व्यवसाय बंद होण्याची शक्यता
व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने शहरातील हॉटेल व्यवसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या काही हॉटेल्समध्ये स्टॉकमध्ये असलेल्या सिलेंडरवरच व्यवसाय सुरू आहे. मात्र येत्या दोन दिवसांत नवीन सिलेंडर उपलब्ध न झाल्यास अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. प्रशासनाकडून व्यावसायिक गॅस टाक्या उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर हॉटेल व्यवसायासाठी लागणाऱ्या टाक्या मिळत नसल्याचे हॉटेल आणि बार असोसिएशनचे सचिव अविनाश मोरे यांनी सांगितले. त्यामुळे लवकरात लवकर गॅस टाक्यांचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यवसायिक अविनाश मोरे यांनी व्यक्त केली आहे.
गॅस तुटवड्याच्या अफवा, प्रशासनाचे स्पष्टीकरण
दरम्यान, जिल्ह्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी गॅस टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गॅस सिलेंडरची साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment