अहिल्यानगर महापालिका स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती ठरले, ‘यांची’ होणार निवड



अहिल्यानगर - महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे सुभाष लोंढे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली बारस्कर, तर उपसभापतीपदासाठी भाजपच्या वर्षा सानप यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, या तिन्ही पदांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर आज, मंगळवारी होणार्‍या विशेष सभेत प्रक्रिया पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

स्थायी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी (9 मार्च) संपली. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपकडून नगरसेवक सुभाष लोंढे यांनी नगरसचिवांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. या पदासाठी लोंढे यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यांच्या उमेदवारी अर्जावर नगरसेवक मनोज कोतकर हे सूचक, तर निखिल वारे हे अनुमोदक आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली बारस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या अर्जावर सुनीता भिंगारदिवे या सूचक, तर अनिता शेटिया या अनुमोदक आहेत. तसेच उपसभापतीपदासाठी भाजपच्या वर्षा सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या अर्जावर वंदना ताठे या सूचक आणि रोशनी त्र्यंबके या अनुमोदक आहेत.

दरम्यान, या तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने संबंधितांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार आज होणार्‍या विशेष सभेत निवडीची प्रक्रिया पार पडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.



0/Post a Comment/Comments