ना कंगना, ना कियारा; 'ही' अभिनेत्री साकारणार मधुबाला?



मुंबई: मधुबाला म्हटलं, की एक अलौकिक सौंदर्य अन् अदाकारी समोर येते. हिंदी मनोरंजनसृष्टीसाठी हे नाव एखाद्या गूढरम्य कथेसारखं राहिलं आहे. आज इतक्या वर्षांनंतरही या नावाची चर्चा होणं, ही गोष्ट दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांच्या लोकप्रियतेची प्रचिती देणारी आहे. याच कारणास्तव गेली अनेक वर्षं मधुबाला यांच्या चरित्रपटाची चर्चा रंगली. त्यांच्यावर सिनेमा झालाच, तर त्यात कुणी काम करावं, याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारची मतं व्यक्त केली.

अगदी माधुरी दीक्षितपासून करिना कपूर, कंगना रणौतआणि अलीकडे कियारा अडवाणी यांच्या नावाची चर्चा झाली. आता इंडस्ट्रीतल्या ताज्या चर्चेनुसार, 'सैय्यारा' फेम अभिनेत्री अनीत पड्डा हिला मोठ्या पडद्यावर मधुबाला साकारण्याची संधी मिळणार आहे, असं कळतंय. एकीकडे ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नाही असंही बोललं जात आहे. याआधी कियारा अडवाणीचं नाव चर्चेत होतं. मात्र, कियारा मीनाकुमारी यांच्यावरील चरित्रपट करत असल्याचं पक्कं झाल्यानं ती या चर्चेच्या पर्यायांतून बाहेर पडली आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेत मधुबाला यांची बहीण मधुर बृज भूषण यांचाही सहभाग असल्याचं कळतंय, तर दिग्दर्शन जसमीत के. रीन करणार आहे. सिनेमाच्या पोस्टरची वा फर्स्ट लूकची प्रेक्षक वाट पाहत असताना अद्याप कोण अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. तोपर्यंत या विषयाची चर्चा होतच राहणार, असं दिसतंय.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं दिग्दर्शन जस्मित के. रिन करणार आहेत. जस्मित यांनी यापूर्वी आलिया भट्ट अभिनीत 'डार्लिंग्स' या चित्रपटाचं यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. मधुर बृज भूषण या स्वतः या चित्रपटाच्या सह-निर्मात्या आहेत, ज्यामुळं हा चित्रपट अधिक वास्तववादी असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 

0/Post a Comment/Comments