इराण-इस्रायल युद्धात महाराष्ट्रातील तरुणाचा मृत्यू, ड्रोनने घेतला बळी



मुंबई - पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता थेट मुंबईत उमटले आहेत. ओमानच्या किनारपट्टीवर मस्कतजवळ एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या आत्मघातकी ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय भारतीय खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दीक्षित सोलंकी असे या मृत तरुणाचे नाव असून, या युद्धजन्य परिस्थितीमुळे आतापर्यंत तीन भारतीयांना आपला जीव गमवावा लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मूळचा दीवचा असलेला दीक्षित सोलंकी हा व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाला होता आणि कांदिवली भागात वास्तव्यास होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे ५२ नॉटिकल मैलांवर असलेल्या ‘MKD Vyom’ या ऑईल टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने धडक दिली. हा स्फोट इतका भीषण होता की, टँकरच्या इंजिन रूमला तात्काळ मोठी आग लागली. या आगीत होरपळून दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.

दीक्षित हा दीवमधील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे, कारण महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यविधीसाठी तो गावी आला होता आणि काही दिवसांपूर्वीच पुन्हा कर्तव्यावर रुजू झाला होता. मात्र, कामावर परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच काळाने त्याच्यावर झडप घातली.
हे ही वाचा ... 

भारतीय विद्यार्थिनीचा टेक्सासमध्ये मृत्यू, क्षणात स्वप्नांचा चुराडा...  

गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, सोशल मिडीयावर होतेय तुफान व्हायरल... 

युद्धामुळे वाढलं भारतातील शेतकऱ्यांचं टेन्शन, नेमकं काय काय होणार? 


0/Post a Comment/Comments