"फुला" चित्रपटात उलगडणार वाघ्या-मुरळीचं जग, काय आहे कथा...



मुंबई - महाराष्ट्राच्या मातीतील संस्कृती आणि परंपरेला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी 'फुला' हा चित्रपट सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला असून, त्यात वाघ्या-मुरळीच्या जीवनातील श्रद्धा, भक्ती आणि त्यांच्या वाट्याला येणारा सामाजिक संघर्ष यांची झलक पाहायला मिळते. ही कथा केवळ मनोरंजनात्मक नसून, लोकसंस्कृतीचे एक वास्तववादी चित्रण आहे. टीजरमधील दमदार संवाद आणि लोकसंगीतामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच आगळ्यावेगळ्या विषयांवर आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे चित्रपट येत राहिले आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडलीय म्हणजे फुला चित्रपट. याच परंपरेला पुढे नेणारा आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या वाघ्या-मुरळी प्रथेवर प्रकाश टाकणारा 'फुला' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

अभिनेता सुबोध भावे यांचा आवाज टीजरला लाभला आहे. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट आणला असून तो १७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी "फुला" या चित्रपटाची निर्मिती केलीय. शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कथा, दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे तर पटकथा रवीकिरण जावीर यांचे आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी केली.

राहुल प्रजापती यांचे संकलन, वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी स्वरसाज दिला आहे. नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील, रंगभूषाकार समाधान भोरे आहेत.

काय आहे 'फुला'ची कथा?

"फुला" ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. साखळदंडानी बांधलेली, आजुबाजूला हळद पडलेली अशी फ्रेम, सुबोध भावे यांच्या आवाजात यत्र नार्यस्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता या संस्कृत ओळींनी सुरू होणारा टीजर लक्ष वेधून घेतो. त्यानंतर एका मागोमाग एक देखण्या दृश्यप्रतिमांतून या चित्रपटाचा पोत कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. एका मुलीच्या अस्तित्वावर निर्माण होणारा समाजाचा प्रश्न हा या चित्रपटातून मांडला जाणार आहे.

वाघ्या आणि मुरळी यांची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. मात्र, या परंपरेच्या पडद्यामागे अनेक वेदना, संघर्ष आणि सामाजिक वास्तव दडलेले असते. 'फुला' हा चित्रपट याच वास्तवाचा वेध घेतो. टीजरमध्ये आपल्याला एका छोट्या मुलीचा प्रवास दिसतो, जिला या परंपरेत वाहून दिले जाते. तिथून तिची भक्ती आणि जगण्यासाठीचा संघर्ष कसा सुरू होतो, याची हृदयस्पर्शी झलक टीजरमध्ये पाहायला मिळते.


 

0/Post a Comment/Comments