मंदिर प्रशासनाने शनिदेवालाच कोंडून ठेवले, खा. निलेश लंके यांनी व्यक्त केला संताप



अहिल्यानगर - ज्या शनिदेवाच्या विश्वासावर शनिशिंगणापूर ग्रामस्थ आपली घरे उघडी ठेवतात, त्याच शनिदेवाला सुरक्षेच्या नावाखाली नट-बोल्टच्या दरवाजात बंदिस्त करण्यात येत असल्याचा प्रकार अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी उघड केला आहे. खा. लंके हे २५ एप्रिल रोजी रात्री शनिदर्शनासाठी गेले असता प्रशासनाने चक्क शनिदेवालाच नट-बोल्टच्या दरवाजाच्या आत कोंडून घेतल्याचे दिसून आले. यावर लंके यांनी सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ बनवून प्रशासनावर जोरदार टीका केली. शनिदेवाला अशा प्रकार बंदिस्त करणे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशाराही खा. लंके यांनी यावेळी दिला.

शनिवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास खासदार लंके हे शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासमवेत अहिल्यानगर महापालिकेचे नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह बडू साबळे, सचिन पठारे, प्रथमेश महिंदरकर आदी उपस्थित होते. शनिदेवाच्या शिळारुपी मूर्तीभोवती करण्यात आलेली लोखंडी दरवाज्याची तटबंदी पाहून खा. लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या शिंगणापूरची ओळख घरं आहेत, पण दरवाजे नाहीत अशी जागतिक कीर्तीची आहे, तिथेच देवाला बंद केल्याबाबत त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. 

या प्रकारावरुन संतापलेल्या खा. लंके यांनी फेसबुकच्या माध्यमातून मंदिर प्रशासनावर तोफ डागली आहे. ते म्हणाले, आमचा पवित्र शिळारुपी शनिदेव हा ऊन, वारा, पावसात कोणत्याही छताविना भक्तांसाठी सदैव उभा असतो. मग हा नट-बोल्टचा अडथळा कोणासाठी? सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा किंवा दर्शनाची वेळ ठरवा, याला आमचा विरोध नाही. पण परंपरेच्या विरोधात जाऊन देवाला बंदिस्त करणे आम्हाला कदापि मान्य नाही. याबाबत आयुक्तांशी पत्रव्यवहार करुन मंदिर प्रशानाला जाब विचार आहे, असा इशारा खा. लंके यांनी दिला.

शनि शिंगणापूरच्या परंपरेनुसार, येथील शनिदेव हे उघड्यावरच विराजमान असतात. परंतु, अलिकडच्या काळात व्यवस्थापनाच्या नावाखाली जे बदल केले जात आहेत, त्यामुळे परंपरेला धक्का लागत असल्याची भावना सामान्य भाविकांमध्ये निर्माण झाली आहे. आता खासदारांनीच या प्रकरणात उडी घेतल्याने मंदिर ट्रस्ट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

0/Post a Comment/Comments