टोकियो - जपानच्या उत्तरीय भागात रविवारी (दि.१९) सायंकाळी ४:५३ वाजता ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. जपान हवामान खात्याने तात्काळ इवाते, आओमोरी आणि होक्काइडो प्रांतातील किनारपट्टी भागासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. इवाते प्रांत आणि होक्काइडोच्या काही भागांमध्ये ३ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा पोहोचू शकतात. लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भूकंपाचे हादरे इतके तीव्र होते की, शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकियोमधील उंच इमारतीही हादरल्या. भुकंपानंतर सुनामीच्या लाटा वारंवार किनारपट्टीला धडकू शकतात, त्यामुळे धोका पूर्णपणे टळेपर्यंत किनारपट्टीवर किंवा नद्यांच्या जवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नदी किनाऱ्यापासून लांब राहण्याचा दिला इशारा
असेही सांगितले जात आहे की, लाटा अपेक्षेपेक्षा लवकर किंवा उशिरा येऊ शकतात आणि त्यांची उंचीही अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. समुद्रकिनारे आणि नद्यांजवळ राहणाऱ्या रहिवाशांना दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण पाण्याची पातळी अचानक वाढून परिसरात पुरासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने या संकटाचा सामना करण्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला आहे. २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या ९.० तीव्रतेच्या भूकंपाच्या आठवणी या घटनेने ताज्या झाल्या आहेत, ज्यामध्ये १८,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Post a Comment