मुंबई - अभिनेता राजकुमार रावच्या बहुप्रतीक्षित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहे. टीझरमधील त्याचा लूक, देहबोली आणि संवाद पाहून प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
२६/११ च्या लढ्याची कथा
चित्रपटाच्या टीझरमध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतरच्या न्यायालयीन लढ्याची झलक दाखवण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी दहशतवादी अजमल कसाबविरोधात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडत त्याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या ऐतिहासिक खटल्यासह त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांवर चित्रपट आधारित असल्याचे दिसून येते.
टीझरमध्ये कोर्टरूममधील काही प्रभावी दृश्ये दाखवण्यात आली असून, राजकुमार रावने उज्ज्वल निकम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून भूमिका साकारल्याचे स्पष्ट जाणवते. जरी टीझरमध्ये कथानकाबाबत फारशी माहिती उघड करण्यात आलेली नसली, तरी पार्श्वसंगीत, संवाद आणि दृश्यरचना प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.
निकम यांची ऐतिहासिक कारकीर्द
उज्ज्वल निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकिलांपैकी एक मानले जातात. त्यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण तसेच कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण यांसारख्या अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे. कायदेविषयक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
तसेच त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कायदेविषयक कारकिर्दीची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २०२५मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. आता त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची कथा ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment