नगर - पुणे महामार्गावरील कामक्षा माता मंदिरात मोठी चोरी, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर - पुणे महामार्गावर असलेल्या कामरगाव (ता. नगर) येथील ग्रामदैवत कामक्षा माता मंदिरात १७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात ४ चोरट्यांनी मोठी चोरी केली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून देवीचा चांदीचा मुकुट तसेच मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कामरगाव गावात मध्यवस्तीत पुरातन आणि परिसरात प्रसिद्ध असलेले कामक्षा माता मंदिर आहे. १७ जुलै रोजी पहाटे ३.१० वाजण्याच्या सुमारास या मंदिराजवळ ४ चोरटे आले. त्यांनी तोंडला रुमाल बांधलेले होते, तर हातात हातमोजे घातलेले होते. या चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यापैकी २ जण दरवाजाजवळ उभे राहिले आणि दोघे जण आत मध्ये गेले. आत गेलेल्या चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत मूर्तीचा चांदीचा मुखवटा, २ पितळी मुकुट, मूर्तीवरील सुमारे सोन्याचे दागिने हिसकावत काही वेळातच सर्व मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला. अवघ्या ३ मिनिटांमध्ये हे चोरटे आले आणि चोरी करून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. चोरट्यांनी मंदिराशेजारील काही घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. तसेच जाताना चोरट्यांनी गावात राहणारे स्टेट बँक अधिकारी सतीश सोनवणे व रज्जाक शेख यांच्या बंद घरात देखील उचका पाचक केल्याचे सांगण्यात आले.

चोरी करतानाची आणि चोरटे पळून जातानाची घटना मंदिराच्या आत आणि बाहेरील भागात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पहाटे ग्रामस्थांना मंदिरात चोरी झाल्याचे समजले. त्यावेळी तेथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. याबाबत नगर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, .फौ. दत्तात्रय हिंगडे, पोलीस अंमलदार जगदीश जंबे, नितीन शिंदे, विक्रांत भालसिंग, चालक विकास शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी व पंचनामा केला.

चोरट्यांच्या तपासासाठी मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज मधील दिसणाऱ्या चोरट्यांच्या सारख्या हालचाली असलेला एक जण काही दिवसांपूर्वी या परिसरात फिरताना काही ग्रामस्थांना दिसला होता. त्याने अगोदर येवून रेकी केली आणि नंतर सफाईदारपणे ही चोरी केली असावी अशी शक्यता ग्रामस्थांनी सदर सीसीटीव्ही फुटेज पाहून व्यक्त केली आहे.  

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मंदिर ट्रस्ट चे सचिव संदीप रामचंद्र गुंजाळ (वय ४५, रा. कामरगाव, ता.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments