व्हिएतनाममधील बेटाजवळ ३२ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ पर्यटकांचा मृत्यू
व्हिएतनामच्या फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट उलटल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून भारतीय दूतावासाने स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बचावकार्याची माहिती घेतली. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने सांगितले की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. दरम्यान दुर्घटनेत आतापर्यंत १५ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.
दूतावासाने एक्स अकाऊंटवरून या अपघाताची माहिती दिली. “काही तासांपूर्वी फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट उलटल्याची एक दुःखद घटना घडली आहे. घटनेचा तपशील मिळवला जात आहे. स्थानिक प्रशासन बचाव आणि शोध कार्य करत आहे”, अशी माहिती पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेशी संबंधित काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान समुद्रात उलटलेली बोट दिसताच जवळच्या इतर पर्यटक बोटी तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी धावून आल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. भारतीय दूतावासाने बाधित कुटुंबांना माहिती आणि मदत पुरवण्यासाठी हो चि मिन्ह शहरात एक नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे.
या पोस्टमध्ये दूतावासाने नमूद केल्यानुसार, बाधित कुटुंबांना मदत पुरवली जात आहे. तसेच नातेवाईकांनी संपर्क साधावा यासाठी काही फोन नंबरही एक्स पोस्टमध्ये शेअर करण्यात आले आहेत. आम्ही प्रत्येक मदतीसाठी आणि तुमच्या प्रश्नांसाठी उपलब्ध आहोत, असेही या मजकूरात नमूद केले आहे.

Post a Comment