साडेसहा लाखांची उधारी न मिळाल्याने व्यावसायिकाची गळफास घेत आत्महत्या


अहिल्यानगर - बोल्हेगाव परिसरातील एका व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. दुकानाचे सिमेंटचे पैसे न मिळाल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. किरण तानाजी भोसले (वय ३४, जिजाऊ नगर, विघ्नहर्ता कॉलनी, बोल्हेगाव) असे मयताचे नाव आहे.

याप्रकरणी मृत व्यावसायिकाच्या पत्नी अश्विनी किरण भोसले यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सचिन जगन्नाथ दाताळ (रा. बोल्हेगाव)याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण भोसले हे बोल्हेगाव येथे बिल्डींग मटेरीअलचे दुकान चालवत होते. आरोपी सचिन जगन्नाथ दाताळ याने त्यांच्या दुकानावरून उधारीवर सिमेंट खरेदी केले होते. त्याच्याकडे ६ लाख ४९ हजार ५०० रुपयांची मोठी रक्कम थकीत होती. अनेकदा पैशांची मागणी करूनही आरोपीने उधारीचे पैसे दिले नाहीत. या आर्थिक विवंचनेमुळे आणि इतर दुकानदारांचे देणे भागवण्याच्या तणावाखाली किरण भोसले आले होते.

याच नैराश्यातून त्यांनी २६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरातील खोलीत गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश कोल्हे यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर दुपारी अश्विनी भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन दाताळ याच्या विरुद्ध बीएनएस कलम १०८ व अनुसूचित जाती जमाती अधिनियम कलम ३ (२)(व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसेहे करत आहेत. 


 

0/Post a Comment/Comments