पैशाचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवून फसवणारी टोळी पकडली, ९२ लाखांच्या बनावट नोटा जप्त


अहिल्यानगर - पैशाचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणारी तिघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर एमआयडीसी परिसरात पकडली आहे. या टोळीकडून ९२.०९ लाखांच्या बनावट नोटांसह १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेश आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहीद शेख, संदिप पवार, विष्णु भागवत, सुयोग सुपेकर, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांचे विशेष पथक २९ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गणेश दिलीप शेवाळे व त्याचे काही साथीदार भारतीय चलनाच्या बनावट नोटा स्वतःच्या फायद्यासाठी व्यवहारात वापरण्याच्या उद्देशाने बाळगून आहेत. मिळालेल्या या खबरीच्या आधारे पथकाने गणेश शेवाळे राहत असलेल्या घरात छापा टाकून घरझडती घेतली. 

यावेळी घराच्या खोलीत जिन्याखालील पिशवीमध्ये भारतीय चलनाच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदांचे बंडल आढळून आले. या कारवाईदरम्यान पथकाने गणेश दिलीप शेवाळे (वय ३३, रा. कोर्टाजवळ, अशोकनगर, बारामती, जि. पुणे), सुमित विकास चंदनशिवे (वय २५, रा. तांदुळवाडी, बारामती, जि. पुणे) आणि सुरज वसंत कांबळे (वय २७, रा. झारगडवाडी, बारामती, जि. पुणे) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांच्याकडून ५०० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १८,४१९ बनावट नोटा (एकूण ९२,०९,५०० रुपयांच्या बनावट नोटा), ५ मोबाईल आणि एक व्हॉक्सवॅगन कंपनीची कार (क्र. एमएच-१४-डीएफ-०३६५) असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता, मुख्य आरोपी गणेश शेवाळे याने या बनावट नोटा त्याचे इतर साथीदार प्रताप धुमाळ (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर), अशोक भीमराज दारकुंडे (रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) या दोघांच्या मदतीने अशोक दारकुंडेच्या फॉर्च्युनर गाडीमधून अम्मु (रा. मालेगाव, जि. नाशिक) याच्याकडून २५ हजार रुपये देऊन आणल्याची कबुली दिली. तसेच, हे आरोपी भोळ्या भाबड्या नागरिकांना 'पैशाचा पाऊस पाडतो' असे आमिष दाखवून, त्यांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करून विश्वास संपादन करत आणि नागरिकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८०, ३१८(४), ३(५) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. 


 

0/Post a Comment/Comments