पारनेरच्या पाणी योजनेसाठी शरद पवारांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ कार्यवाहीचे निर्देश



पारनेर (प्रतिनिधी) - पारनेर शहराच्या दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या ६३ कोटी ४७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन व पत्र दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.खासदार नीलेश लंके यांच्यासह नगरपंचायतचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पारनेर शहराचा पाणीप्रश्न अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी तोडग्याच्या प्रतीक्षेत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या या योजनेला गती देण्याची मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

या पाणीपुरवठा योजनेची अंदाजित किंमत ६३.४७ कोटी रुपये असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक विभाग, नाशिक यांच्याकडून प्रकल्पाला तांत्रिक मान्यता देण्यात आल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता शासनस्तरावर प्रशासकीय मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.

योजनेच्या अंदाजित खर्चामध्ये जीएसटी, कामगार विभागाचे शुल्क तसेच महावितरणचे शुल्क यांचा समावेश करण्यात आला आहे. तांत्रिक स्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्याने प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी शासनाची अंतिम मंजुरी महत्त्वाची ठरणार आहे. पारनेर शहरासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, तिची अंमलबजावणी झाल्यास नागरिकांना दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रकल्पास अंतिम मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी पवार यांनी केली.

पवार यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्याने पारनेरच्या पाणी योजनेच्या मंजुरीच्या प्रक्रियेला आता शासनस्तरावर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी बाळासाहेब कावरे, नितीन अडसूळ, सुभाष शिंदे, बाळासाहेब नगरे, भूषण शेलार, अमित जाधव, अर्जुन भालेकर, दादा औटी, सचिन औटी, शुभम देशमुख आणि योगेश मते उपस्थित होते. पारनेर शहराच्या पाणीप्रश्नावर सातत्याने होत असलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर आता ६३.४७ कोटी रुपयांच्या प्रस्तावित योजनेला प्रशासकीय मंजुरी आणि निधी कधी उपलब्ध होतो, याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.


 

0/Post a Comment/Comments