अहिल्यानगर- जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असतानाच सभासदांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज घेतल्याने या प्रयत्नांना धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत तब्बल ५४१ अर्ज सभासदांनी घेतले असून, ‘बिनविरोध’चा निर्णय झाला असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज का घेतले जात आहेत, असा सवाल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उपस्थित केला. संगमनेर येथे बैठक झाली आणि त्यामध्ये बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असेल; मात्र सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय असा निर्णय घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
माझ्या मनधरणीचा प्रश्नच येत नाही. याबाबत नेत्यांनी बोलले पाहिजे. मी काही बोलू शकत नाही. संगमनेरमध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असेल; मात्र सभासदांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज घेतले आहेत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नेत्यांच्या पातळीवर बिनविरोधाच्या चर्चा सुरू असल्या तरी प्रत्यक्ष सभासदांची भूमिका वेगळी असल्याचे चित्र समोर आले आहे.
जिल्हा बँकेचे महत्त्व अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, बँकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत. बँक चांगली असून तिचे कामही चांगले आहे. त्यामुळे ठेवीदार आणि इतर संबंधितांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, मदतीची मागणी केल्यानंतर सरकारने मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचाही फायदा बँकेला निश्चितपणे होईल.
मात्र, बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले. पालकमंत्र्यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. महायुतीमध्येही त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. या बैठकीबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. एकीकडे शिवसेना बैठक घेत आहे आणि दुसरीकडे त्या बैठकीची माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत सभापती म्हणून आपण भूमिका घ्यायची तरी कशी, असा सवाल शिंदे यांनी केला.
सर्वांच्या बोलण्यात एकसूत्रता राहिलेली नाही, असे चित्र दिसत आहे. त्यामुळेच सभासदांनी स्वतःहून फॉर्म घेण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांना सोबत घेतले पाहिजे. सर्वांना विचारात घेऊनच निर्णय झाला पाहिजे, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
संगमनेर येथे बैठक झाल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोन आला होता. माजी मंत्री शंकरराव गडाख तसेच विवेक कोल्हे यांचाही फोन झाला होता. मात्र, त्यानंतर या संदर्भात आपल्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
तीन अपत्य बाबत प्रश्न विचारण्यात आला असता, या सर्व बाबींचा सारासार विचार करूनच आपण फॉर्म घेतला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. विचार करूनच फॉर्म घेतला असून आता तो भरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अनेक साखर कारखान्यांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असून काही थकीत असल्याबाबत विचारले असता, याबाबतचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेतील, असे शिंदे यांनी सांगितले. सहकार क्षेत्रात आपण पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने याबाबत आपल्याला अधिक माहिती नाही. ज्यांच्या कारखान्यावर कर्ज आहे, त्यांच्या कारखान्याबाबत त्यांनाच विचारा. मी कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५४१ सभासदांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील वातावरण तापले आहे. एका बाजूला बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला सभासदांकडून अर्ज घेण्याचा वाढता ओघ सुरू आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या चर्चांना प्रत्यक्ष सभासदांच्या भूमिकेचे आव्हान उभे राहिले असून, पुढील काही दिवसांत नेत्यांची भूमिका आणि सभासदांचा कौल यामध्ये कोणता मार्ग निघतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment