जिल्हा बँकेसाठी २ नोव्हेंबरला होणार मतदान, मतदारांची दिवाळी आधीच होणार ‘दिवाळी’


अहिल्यानगर - जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून 3 नाव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रारूप निवडणूक कार्यक्रम तयार करून तो सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. त्यास सहकार निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिली असून या मान्यतेनुसार जिल्हा बँकेसाठी आता 2 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होऊन तीन नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, येत्या 28 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून ही मुदत 5 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या 8 दिवसांच्या काळात इच्छुक उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत बँकेची नगर भाजीपाला मार्केट यार्ड मागील बाजू असणार्‍या चाहूराना बुद्रुक या शाखेत निवडणूक कार्यालय सुरू राहणार आहे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकीसाठी दररोज दाखल होणार्‍या अर्जाची यादी त्यादिवशी संबंधित कार्यालयात चार वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबरला दाखल सर्व अर्जांची छाननी पूर्ण करून वैध इच्छुकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेनंतर 7 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोंबर दरम्यान दाखल अर्ज पैकी ज्यांना माघार घ्यायची त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवण्यात आलेली आहे. या काळात दाखल अर्जापैकी ज्यांना माघार घ्यायची आहे ते विहित नमुन्यात अर्ज दाखल करून जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेऊ शकणार आहेत. त्यानंतर 22 ऑक्टोंबरला निवडणुकीतील अंतिम मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर 2 नोव्हेंबरला बँकेसाठी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया होऊन तीन नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे या निवडणूक कार्यक्रमाला राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांनी मान्यता दिले आहे.


 

0/Post a Comment/Comments