भिंगार मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, पोलिसांवर गंभीर आरोप


अहिल्यानगर - भिंगार येथे २३ सप्टेंबर रोजी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सिव्हील इंजिनियर असलेले शुक्लेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपक रामकिसन वाघस्कर (वय ४०, रा.वाघस्कर गल्ली, भिंगार) यांचा रस्त्यावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाघस्कर यांच्या मृत्यूनं शहरात खळबळ उडाली. या घटनेवरून पोलिसांवर गंभीर आरोप करत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तींचे विसर्जन न करता मिरवणूक जागेवरच थांबवून रात्री उशिरापर्यंत भिंगार वेस येथे ठिय्या आंदोलन केले. तसेच २४ सप्टेंबर रोजी सकाळ पासूनच भिंगार शहरात कडकडीत बंद पाळण्यात येवून नगर पाथर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दुपारी उशिरा पर्यंत अनेक गणेश मूर्ती रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आलेल्या होत्या त्यामुळे तणाव कायम होता.

अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गुलाल उधळण्यावरून पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर भिंगार परिसरात संतापाची लाट उसळली. शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक दिलीप टिपरसे आणि भिंगार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या कारवाईमुळेच लाठीचार्ज झाला, असा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हा तर 'जालियानवाला बाग' चा जनरल डायर- आ.संग्राम जगताप

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या घटनेच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत भिंगारमध्ये रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं. यावेळी त्यांनी पोलीस उपअधीक्षक डॉ.दिलीप टिपरसे यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले. पंजाब मधील जालियानवाला बाग गोळीबार प्रकरणाचा दाखला देत जनरल डायर ची भूमिका शहरात बजावणारा हा अधिकारी आपल्याला नको अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त करत  दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत भिंगार बंद ठेवण्यासह गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं.

भिंगार परिसरात कडकडीत बंद

दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूप्रकरणी भिंगार परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ भिंगारमधील गणेश मंडळांनी गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आज २४ सप्टेंबर रोजी सकाळ पासून भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला. सर्व व्यापारी दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात शुकशुकाट दिसत होता. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जनावर बहिष्कार टाकल्याने सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती रस्त्याच्या कडेला तशाच ठेवण्यात आलेल्या होत्या. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बराच वेळ नगर पाथर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनही केले.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले...

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबाबतच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ बाबत आणि दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूबाबत पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी २४ सप्टेंबर रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरला लावलेली ट्रॉली हलत होती. या ट्रॉलीवर काही मुले असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पायावर सौम्य लाठीमार केला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. याच लाठीमारात दीपक वाघस्कर यांच्यावर मारहाण झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली.

मात्र हा लाठीमाराचा व्हिडीओ रात्री ९ वाजेच्या सुमारासचा आहे. त्यात दीपक वाघस्कर नव्हते. ते तेथे उपस्थितही नव्हते. रात्री त्यांच्या मंडळापासून ते घरी जायला निघाले तेव्हा साधारण रात्री ९.५५ च्या सुमारास ते खाली पडले. त्यांना तातडीने त्यांचे सहकारी आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी रुग्णालयात हलविले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. दरम्यान, दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येणार असून, त्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी सुरु केलेली असून जर यात कोणी दोषी आढळले तर त्यांना पाठीशी न घालता कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधिक्षक सुदर्शन यांनी सांगितले. लाठीमाराच्या व्हिडीओ बाबत चुकीच्या चर्चा करून अफवा पसरवू नका असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

आता सर्वांचे लक्ष पोस्टमार्टम अहवालाकडे लागले असून, दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, लाठीमाराचा त्यांच्याशी संबंध होता का? आणि या प्रकरणात नेमकी चूक कोणाची होती? याचं उत्तर चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान मयत दीपक वाघस्कर यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, बहिण, २ चुलते, चुलत भाऊ असा परिवार आहे. 


 

0/Post a Comment/Comments