जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या घडामोडींवर सभापती प्रा.राम शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले....


अहिल्यानगर - ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही रविवारी संगमनेर येथे बैठक घेऊन बिनविरोध निवडणुकीसाठी पुढाकार घेतला. मात्र, दुष्काळाचे कारण पुढे करून कोणी स्वतःचा राजकीय अजेंडा राबवत असेल, तर ते योग्य नाही, अशी अप्रत्यक्ष टीका भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सोमवारी केली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेर येथे बैठक झाली.

बिनविरोध निवडणुकीला आपला विरोध नाही; मात्र, दुष्काळी परिस्थितीचा आधार घेऊन एखाद्याने स्वतःचा अजेंडा पुढे नेणे योग्य ठरणार नाही. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदतीचा हात मिळावा आणि बँकेचे हित जपले जावे, यासाठी सक्षम व विश्वासार्ह संचालक मंडळ असणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. बिनविरोध निवडणुकीसाठी पुढाकार घेणार्‍यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घ्यावा आणि त्यासाठी व्यापक सहमती मिळवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपली सक्रिय भूमिका राहणार असल्याचे आपण यापूर्वीच स्पष्ट केले होते, असे सांगून शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड तालुक्यातून आपल्या नावाचा ठरावही करण्यात आला आहे. आपण वरिष्ठ पदावर असलो तरी सहकार क्षेत्रातील वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी गाठीभेटी घेतल्या आहेत. सहकाराच्या निवडणुकीत परिस्थितीनुसार सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागते. संगमनेर येथे झालेल्या बैठकीसाठी आपल्याला निरोप देण्यात आला होता. मात्र, बैठकीचा नेमका अजेंडा काय होता, याची आपल्याला कल्पना नव्हती, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिफारशीने नियुक्ती झाली असती तर रांगा लागल्या असत्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आ. रोहित पवार यांनी सभापतीपद मिळण्यामागे आपला हात असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी एखाद्याच्या शिफारशीने नियुक्त्या होत असत्या, तर अशा शिफारशीसाठी अनेकांच्या रांगा लागल्या असत्या, असे म्हटले. कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रचंड दुष्काळी परिस्थिती असताना आपण सहा महिने मतदारसंघात फिरकलो नसल्याची कबुली पवार देत आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वप्रथम कर्जत-जामखेडमध्ये बैठक घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत उपाययोजनांसंदर्भात निर्णय घेतले, असे त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्रिय राहणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.

0/Post a Comment/Comments