अहिल्यानगर - अहिल्यानगर न्यायालयाच्या परिसरात सुरू असलेली कायदेशीर केस
मागे घेण्याच्या कारणावरून एका एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी
मारहाण करून धारदार चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प
पोलीस ठाण्यात दोघांसह इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
योगेश राम सटाले (वय ३०, रा. सारसनगर, अहिल्यानगर)
असे फिर्यादी असलेल्या एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्याचे नाव आहे. १४ ऑक्टोबर रोजी
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर न्यायालय परिसरात ही घटना घडली. श्रीराम अण्णासाहेब
भेंडेकर आणि सरला वाणी यांच्यासह इतर दोन जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
फिर्यादी हे न्यायालय परिसरात असताना
आरोपींनी त्यांना न्यायालयातील चालू असलेली केस मागे घेण्यास सांगितले. फिर्यादीने
केस मागे घेण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत
लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच आरोपींपैकी एकाने हातातील धारदार चाकूने
वार करून फिर्यादीला जखमी केले.
घटनेनंतर जखमी फिर्यादीला उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल
करण्यात आले. रुग्णालयातून प्राप्त झालेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला
असून, पुढील तपास सपोनि तेजश्री थोरात करीत आहेत.

Post a Comment