अहिल्यानगर - येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एका व्यक्तीने स्वतःकडील हिरव्या रंगाच्या ड्रममधील डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे व स्वतःच्या अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे हा प्रकार घडला. आरोपी नितीन दत्तात्रय आजबे (रा. मेनरोड, जामखेड, ता. जामखेड) याच्या भावाने जामखेड मधील कलाकेंद्र बंद करावेत या मागणीसाठी उपोषण सुरु केलेले आहे. तसेच ही मागणी तात्काळ मान्य करावी यासाठी नितीन आजबे याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जामखेड पोलीस ठाण्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त नेमला होता. नितीन आजबे हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला आणि त्याने अचानक स्वतःकडील हिरव्या रंगाच्या ड्रममधील ज्वलनशील द्रव पदार्थ निष्काळजीपणे हाताळून तो स्वतःच्या अंगावर ओतून घेतला. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल याची पूर्ण जाणीव असतानाही त्याने स्वतःच्या अंगावर तो द्रव पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याला ताब्यात घेतले व आत्मदहन करण्यापासून रोखले.
या प्रकरणी पो.कॉ.ईश्वरसिंग परदेशी (वय ३८, नेमणूक जामखेड पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम २८७ व २२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार चांगदेव आंधळे करत आहेत.

Post a Comment