पारनेर (प्रतिनिधी) - पीकविम्याचे एक लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगून बँकेतून
चेक काढून देण्याच्या बहाण्याने एका अनोळखी मोटारसायकलस्वाराने ७० वर्षीय वृद्ध
महिलेची फसवणूक केल्याची घटना पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार शिवारात घडली. चेक
काढण्यासाठी कर भरावा लागेल, अशी बतावणी करून संबंधिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याची
पानपोत आणि कानातील सोन्याची कर्णफुले व वेल असा अंदाजे एक लाख रुपये किमतीचा ऐवज
घेऊन पोबारा केला.
सुमन नारायण नवले (वय ७०, रा. नवलेवाडी, कान्हूर पठार, ता. पारनेर) यांनी याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली.
आजी म्हणत विश्वास संपादन केला
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमन नवले या नवलेवाडी येथे राहतात. त्यांना चार मुली असून त्यांची लग्ने झालेली आहेत. त्या घरी एकट्याच राहतात. १६ ऑक्टोबर रोजी प्रकृती ठीक नसल्याने त्या कान्हूर पठार येथील दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. तेथे सलाईन घेतल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. उपवास असल्याने गावातील चौकात उपवासाचे साहित्य खरेदी करण्यासाठी त्या थांबल्या होत्या. त्याचवेळी अंदाजे ४० ते ४५ वर्षाचा एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. आजी, तुमच्या पीकविम्याचा एक लाख रुपयांचा चेक बँकेत आला आहे. मी किन्ही येथे बँकेत काम करतो. तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. माझ्यासोबत चला, मी तुमचा चेक काढून देतो, असे सांगून त्याने वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला.
तीन किलोमीटर अंतरावर नेऊन दागिने घेतले
संबंधित इसमाध्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुमन नवले या त्याच्या मोटारसायकलवर
मागे बसल्या. तो त्यांना कान्हूर पठार ते किन्ही रस्त्याने घेऊन जात होता.
प्रवासादरम्यान त्याने त्यांना 'तुम्ही सुमन नवले आहात ना?' असे विचारले. त्यामुळे आपल्याला
ओळखणारी व्यक्ती असावी, असा त्यांच्याकडून समज झाला. सुमारे तीन किलोमीटर अंतर गेल्यानंतर कान्हूर
पठार शिवारात शिवेजवळ त्याने मोटारसायकल थांबवली. त्यानंतर चेक काढण्यासाठी कर
भरावा लागेल, असे सांगून त्याने त्यांच्याकडे पैशांची चौकशी केली. आपल्याजवळ दोन हजार रुपये
असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर संबंधिताने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने
काढून देण्यास सांगितले. ते दागिने सोनाराकडे नेऊन पैसे घेऊन येतो, अशी बतावणी त्याने केली. त्याच्या
बोलण्यावर विश्वास ठेवून सुमन नवले यांनी गळ्यातील सोन्याची पानपोत तसेच कानातील
कर्णफुले व वेल त्याच्याकडे दिले. त्यानंतर तुम्ही येथेच थांबा, मी सोनाराकडे जाऊन येतो, असे सांगून तो मोटारसायकलवरून करंडी
गावाच्या दिशेने निघून गेला.
बराच वेळ वाट पाहूनही तो परतलाच नाही
दागिने घेऊन गेलेला इसम परत येईल, या अपेक्षेने सुमन नवले बराच वेळ त्याच ठिकाणी थांबून
राहिल्या. मात्र, तो परत आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी
त्यांची नातेवाईक छकुली खोडदे तेथून जात असताना नवले यांनी तिला घडलेला प्रकार
सांगितला. संबंधित इसम चोर असावा, असे तिने सांगितल्यानंतर नवले यांनी आपले जावई मारुती
हरिभाऊ भोर यांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या सोबत पारनेर
पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.
एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने
फिर्यादीनुसार, फसवणूक करून नेलेल्या ऐवजात अंदाजे ५० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची
सोन्याची पानपोत आणि अंदाजे ५० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची कर्णफुले
व वेल यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत सुमारे एक लाख रुपये
असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संशयिताचा शोध घेण्याचे आव्हान
फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार, संशयित इसम रंगाने गोरा, सडपातळ बांध्याचा असून त्याने
पांढऱ्या रंगाचा काळे ठिपके असलेला शर्ट परिधान केला होता. त्याचे नाव व गाव
महिलेला माहीत नाही. तसेच, मोटारसायकलचा क्रमांकही त्यांना पाहता आला नाही. त्यामुळे
संशयिताची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. पीकविम्याच्या
रकमेचे आमिष दाखवून वृद्ध महिलेची फसवणूक झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी
अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवताना सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली
आहे. विशेषतः बँकेतील काम करून देण्याचे किंवा सरकारी योजनेतील पैसे मिळवून
देण्याचे आमिष दाखवून कोणी दागिने अथवा पैसे मागत असल्यास खातरजमा केल्याशिवाय
त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.

Post a Comment