अहिल्यानगर - रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालय अहिल्यानगर येथे कार्यालय अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजवर्धन उर्फ भाऊसाहेब दत्तात्रय पांडुळे (वय ५०, रा. सारसनगर, अहिल्यानगर) यांनी केडगाव बायपास चौक येथील एका हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे.
पांडुळे यांनी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्या हॉटेलमध्ये रूम घेतली होती. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी अनेकदा रुममध्ये इंटरकॉमवर तसेच त्यांच्या मोबाईल वर फोन करूनही पांडुळे यांनी प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता त्यांना पांडुळे हे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने तात्काळ कोतवालीचे स.पो.नि. कुणाल सपकाळे यांना फोन करून माहिती दिली.
सपकाळे यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांनी आत्महत्या का केली, हे समजू शकले नाही. आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. या बाबतची माहिती समजल्यावर अनेकांना धक्का बसला.
मयत भाऊसाहेब पांडुळे यांच्या पश्चात पत्नी, १ विवाहित मुलगा, १ विवाहित मुलगी असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांचे ते बंधू होत.

Post a Comment