पारनेर तालुक्यात वाळू तस्करांचे 'एलसीबी' ने कंबरडे मोडले; १ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जण ताब्यात



अहिल्यानगर - पारनेर तालुक्यातील अवैध वाळू तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत तब्बल १ कोटी १६ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, पंकज व्यवहारे, अमोल आजबे, अतुल लोटके, विष्णू भागवत, अशोक लिपणे आणि रोहित येमुल यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना टाकळी ढोकेश्वर ते पारनेर रस्त्यावरून डंपरद्वारे छुप्या मार्गाने वाळूची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्या आधारे पथकाने सापळा रचून तीन डंपर पकडले. यात ६० लाख ९० हजार रुपयांच्या तीन डंपर आणि वाळूसह अक्षय बाबा जेडगुळे (वय २९, रा. वासुंदे), गोरख सखाराम मधे (वय २४, रा. शिखरी वासुंदे), ऋतीक भाऊसाहेब टोपले (वय २४, रा. वासुंदे) यांना ताब्यात घेण्यात आले, तर प्रशांत भिकाजी वाळुंज (रा. काकणेवाडी) व चैतन्य डुमरे (रा. ओतूर) हे दोघे फरार झाले. या सर्वांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर मिळालेल्या दुसऱ्या गोपनीय माहितीवरून पथकाने खडकवाडी शिवारातील बोरवाक नदीच्या ओढ्याजवळ छापा टाकला. तेथे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ५६ लाख ५ हजार रुपये किमतीचे दोन जेसीबी, सोनालिका ट्रॅक्टर ट्रॉलीसह व वाळू जप्त केली. या प्रकरणी योगेश बाळू उघडे (वय २८, रा. वनकुटे) व ओंकार रावासाहेब गोर्डे (वय २२, रा. टाकळी ढोकेश्वर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून ओंकार बोरूडे, सुधीर शिंगोटे, अमोल आल्हाट व रोहित साळवे हे फरार झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १ कोटी १६ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) सह पर्यावरण कायदा कलम ३ व १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेला मुद्देमाल व आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पारनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments