अहिल्यानगर - नगर तालुक्यातील निंबळक येथे माहेरहून सोन्याचे दागिने व पैसे आणण्यासाठी सतत विनाकारण कुरापती काढून शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे कंटाळून निर्मला अविनाश शिंदे (रा. निंबळक, ता. नगर) या विवाहितेने रेल्वे गाडी खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पती अविनाश शिंदे याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयत विवाहितेचे वडील सुरेश बंडू भोसले (वय ६६, रा. जवखेडे दुमाला, ता. पाथर्डी) यांनी ३० सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. आरोपी अविनाश बबन शिंदे (रा. निंबळक, ता. नगर) याने सन २०२० पासून ते १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पर्यंत मयत महिला निर्मला हिच्याकडे माहेरहून सोन्याचे दागिने व पैसे आणण्यासाठी वारंवार तगादा लावला होता.
तसेच विनाकारण कुरापती काढून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीची मयत मुलगी निर्मला हिने १७ सप्टेंबर रोजी निंबळक येथे रेल्वेसमोर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अविनाश शिंदे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment