अहिल्यानगर - शहरातील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जुन्या वादाचा राग मनात धरून काही विद्यार्थी दप्तरामध्ये धारदार शस्त्र घेऊन आल्याची धक्कादायक घटना ३० सप्टेंबर रोजी समोर आली. या घटनेची कुणकुण कोतवाली पोलिसांना वेळीच लागल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याने संभाव्य हिंसाचाराचा मोठा प्रकार टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ काही विद्यार्थी एकत्रित आले होते. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून संशयित विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दप्तरांमध्ये वह्या-पुस्तकांऐवजी धारदार शस्त्रे आढळून आल्याने पोलिसही सतर्क झाले. या कारवाईत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनास्थळावरून दोन दुचाकी तसेच धारदार शस्त्र असलेली एक बॅग पोलिसांनी जप्त केली आहे. हे शस्त्र नेमके कोणत्या उद्देशाने आणण्यात आले होते, तसेच या विद्यार्थ्यांचा पूर्वी नेमका कोणता वाद झाला होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कोतवाली पोलीस करीत आहेत. कोतवालीचे पो.नि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विशाल चिटणीस, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, संदीप पितळे, सुरज कदम, संकेत धिवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment