अहिल्यानगर - जिल्हा बँक ही शेतकर्यांची कामधेनू म्हणून ओळखली जाते. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना या संस्थेची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्याचे निश्चितच स्वागत केले पाहिजे. पण व्यक्तीद्वेष ठेवून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला तर ती बिनविरोध होणार नाही. प्रमुख मंडळींनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसले तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी १ ऑक्टोबर रोजी खा. लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना लंके म्हणाले, निवडणूक ही ठरवून करण्यासारखी गोष्ट नसते. वेळप्रसंगी निर्णय घेतले जातात आणि त्यानुसार निवडणुकीला सामोरे जावे लागते. माझ्यासोबत नेहमीच अनेकजण असतात. हे शक्तिप्रदर्शन नाही. शक्तिप्रदर्शन करायचे असते तर हजारो लोक आणले असते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, याबाबत आमचे सर्वांचे सहमत आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली असून, निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्याचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकर्यांसाठी ही संस्था काम करते, तोच शेतकरी अडचणीत असताना संस्थेची निवडणूक लावणे ही योग्य बाब नाही, असे लंके म्हणाले.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी कोणाचा अजेंडा किंवा उमेदवार निश्चित झाला आहे का, या प्रश्नावर लंके यांनी अध्यक्षपदाचा निर्णय निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे सांगितले.
आज अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच बिनविरोध करण्याची खरी प्रक्रिया सुरू होते. निवडून आलेल्या संचालक मंडळात बहुमत कोणाच्या बाजूने आहे, त्यानुसार अध्यक्ष निवडला जातो. त्यामुळे आताच अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला आहे, असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी
दरम्यान, पालकमंत्री जामखेड तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत असल्याबाबत बोलताना लंके यांनी सरकारकडून ठोस मदतीची मागणी केली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी झालीच पाहिजे. राज्याच्या प्रमुखांनी शेतकर्यांच्या बांधावर आणि शेतावर जाऊन परिस्थिती पाहिली पाहिजे. मात्र केवळ आश्वासन देऊन भागणार नाही. सध्याच्या परिस्थितीत शेतकर्यांना ठोस आणि तातडीची मदत मिळाली पाहिजे. शेतकरी मोठ्या संकटात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करणे, पंचनाम्याऐवजी सरसकट पंचनामे करणे, शेतमजूरांनाही मदत देणे तसेच चारा छावण्या आणि चारा डेपो सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

Post a Comment