अहिल्यानगर - मंत्र्यांच्या कार्यक्रमातच रंगला चोर-पोलिसांचा थरार; पोलिसांनी पाठलाग करताच चोरट्याने संरक्षण भिंतीवरुन उडी



अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आयोजित उद्घाटनाच्या कार्यक्रमात चोर-पोलीस यांच्यात थरार बघायला मिळाला. एक चोरट्याने नागरिकांच्या खिशातून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. पण सुजाण नागरिकांच्या ते लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग सुरु करताच चोर तिथून संरक्षण भिंतीवरुन उडी मारत पळून गेला.

कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात एका भव्य उद्घाटन सोहळ्यादरम्यान चोरट्याने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी नवीन वस्त्रदालनाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडत असताना गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने नागरिकांच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी चोरट्याला पकडले असता पोलीस येत असताना त्याने हाताला हिसका देऊन तिथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी देखील त्याच्या मागे धाव घेतल्याने या कार्यक्रमात चोर - पोलिसांचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

या कार्यक्रमाला आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. याचवेळी विराज हाइट्स या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही सुरू होता. परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती. याच गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने काही नागरिकांच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींच्या खिशातून पैसे काढल्याची माहिती समोर आली आहे.

चोराची संरक्षण भिंतीवरुन उडी

दरम्यान, एका ठिकाणी नागरिकांनी चोरट्याला पकडले. मात्र त्याने हिसका देऊन पळ काढला यावेळी गोंधळ सुरू झाला. पोलिसांनी चोरट्याच्या मागे धाव घेतली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ चोर-पोलिसांचा थरार पाहायला मिळाला. मात्र, पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चोरट्याने एका घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारली आणि तेथून पळ काढला.

विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी आणि मान्यवर तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच अशा प्रकारे चोरीचे प्रयत्न झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांची मजल आता थेट मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत पोहोचली आहे का? अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



 

 

0/Post a Comment/Comments