अहिल्यानगर - सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांची २३.३९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ऋषीकेश महादेव गोल्हार (वय २५, रा. भाळवणी, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश कारभारी थोपटे (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) आणि अक्षय उत्तम हरणे (रा. नांदेड) या दोन संशयित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०२३ पासून ते आजतागायत ही घटना घडली. त्यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांनी फिर्यादी ऋषीकेश गोल्हार आणि त्यांचा मित्र अंकेश अशोक दावभट या दोघांना सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्यांना बनावट व खोटे नियुक्तीपत्रे दाखवली. या माध्यमातून दोघा संशयितांनी या दोघांची २३ लाख ३९ हजार ३७८ रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली केली असता, संशयितांनी त्यांना व्हॉट्सॲपवर धमकीचे मेसेज पाठवून पुन्हा पैसे मागू नका, असा दम दिला. अधिक तपास पोलिस करत आहेत.
अधिकृत वेबसाइटवरच भरती प्रक्रिया व अर्जाची माहिती सैन्यात भरती करण्यासाठी कोणतीही बाहेरील व्यक्ती किंवा एजंट तुम्हाला मदत करू शकत नाही. भारतीय लष्कराची भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, संगणकीकृत आणि केवळ गुणवत्तेवर आधारित असते. भरतीची सर्व माहिती, जाहिराती आणि निकाल joinindianarmy.nic.i n या भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवरच प्रसिद्ध केले जातात. व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावरील फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवू नका. नियुक्तीची कागदपत्रे कोणी देत असतील, पैसे मागत असतील याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा.

Post a Comment