अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या मालकीच्या शेत गट नं.१०३० मधील जागेवर ताबा मारत त्या ठिकाणी पोकलेन मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेकायदेशीर पणे विहीर खोदून शासकीय जागेचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता प्रदीप सदाशिव ढगे (वय ४६, रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक जोगदे व किशोर शिकारे (रा.धनगरवाडी, ता.नगर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांची धनगर वाडी येथे संस्था आहे. या संस्थेसाठी पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी महापालिकेकडे पिंपळगाव माळवी तलाव परिसरात विहीर व बोअरवेल खोदण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र महापालिकेने त्यांना केवल बोअरवेल घेण्याची परवानगी दिली होती. त्याच्या अटी, शर्थींची पूर्तता ही त्यांनी अद्याप केलेली नसताना आणि विहीर खोदण्यास परवानगी नाकारलेली असतानाही त्यांनी त्या ठिकाणी पोकलेन मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेकायदेशीर पणे विहीर खोदून शासकीय जागेचे नुकसान केले.
ही बाब निदर्शनास आल्यावर त्या दोघांना महापालिकेच्या वतीने समज देण्यात आली होती. तरीही त्यांनी विहीर खोदल्याने अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार महापालिका पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता प्रदीप ढगे यांनी ११ एप्रिल रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अशोक जोगदे व किशोर शिकारे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२६ (ब), ३२४ (४), ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment