केडगावच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट, कोतकर गट हाती 'धनुष्यबाण' घेण्याच्या तयारीत



अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केडगावातील राजकारणही चांगलेच तापले असून रोज नवीन घडामोडी घडत आहेत. आतापर्यंत भाजपकडून इच्छुक असणारा कोतकर गट आता हातात धनुष्यबाण घेण्याची तयारी करीत आहे. याबाबत बैठकांचा सिलसिला सुरू असल्याची माहिती मिळाली. यामुळे कोतकर गट शिवसेनेत गेल्यास केडगावच्या मैदानात नवा राजकीय ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

मनपा निवडणुकीसाठी जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणारा कोतकर गट आता शिवसेनेकडून इच्छुक बनला आहे. भाजपकडे कोतकर समर्थकांनी मुलाखती दिल्या खऱ्या पण भाजपकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कोतकर गट आता थांबायला तयार नाही. यामुळे पक्ष व चिन्ह याची वाट न पाहता कोतकरांनी केडगावच्या प्रभाग क्रमांक १६ व १७ मध्ये प्रचारफेरी सुरू करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. हातातून गेलेला केडगावचा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी कोतकर गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेकडून चाचपणी सुरू झाली आहे. कोतकर सेनेकडून इच्छुक असलेबाबत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

कोतकरांना मिळू शकतात ७ जागा

कोतकर सेनेत गेल्यास केडगावच्या दोन प्रभागातील ८ जागांची ते मागणी करू शकतात. मात्र प्रभाग १६ मधून दिलीप सातपुते आहेत. त्यांच्यासाठी एक जागा सोडण्याचा यांचे चिरंजीव ओंकार सातपुते मैदानात उतरले सेनेचा आग्रह होऊ शकतो. तसे झाल्यास कोतकर गटातील एका इच्छुकाला स्वीकृतचा शब्द देऊन माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अजून अंतिम निर्णय झाला नाही.

भानुदास कोतकर तब्बल १७ वर्षांनी प्रचारात 

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी यापूर्वी सन २००८ च्या महापालिका निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला होता. त्यानंतर झालेल्या सन २०१३ व २०१८ च्या निवडणुकीत जिल्हा बंदी असल्याने त्यांना सर्व सूत्र जिल्ह्याबाहेरून हलवावी लागली होती. मात्र आता त्यांची जिल्हा बंदी उठल्याने ते केडगाव मध्ये तब्बल १७ वर्षांनी निवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्षात सक्रीय झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  


 

0/Post a Comment/Comments