नगरच्या डॉक्टरांची सलग तिसऱ्या वर्षी पंढरीची सुमारे २१० किमी सायकलवारी, दिला हा संदेश



अहिल्यानगर - वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत नगरमधील १५ डॉक्टरांनी सायकलवरून पंढरपूर वारी करत सामाजिक आणि धार्मिकतेचा अनोखा संगम घडवून आणला. सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या या वारीत २५० किलोमीटरचे अंतर डॉक्टरांनी दोन दिवसांत पार केले. नागरिकांसाठी आरोग्य विषयी सकारात्मक संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही वारी शनिवारी (२८ जून) पहाटे ५ वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिश्रा यांच्या हस्ते चांदणी चौकात झेंडा दाखवून सुरू झाली. या उपक्रमात नगरच्या विविध भागांतील डॉक्टरांनी सहभाग घेतला. यात डॉ. प्रशांत तुवर, डॉ. राहुल पंडीत, डॉ. रामदास बांगर, डॉ. प्रदीप चोभे, डॉ. गणेश बडे, डॉ. अशोक पाटील, डॉ. दिनेश पाटोळे, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. अमित थोपटे, डॉ. शिवराज गुंजाळ आदींची त्यात समावेश होता. संपूर्ण वारीदरम्यान सहभागी डॉक्टरांचा उत्साह व सातत्य उल्लेखनीय होते. सायकल चालवणे आरोग्यास फायदेशीर आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असा संदेश त्यांनी दिला. पुढील वर्षीही अशीच वारी करण्याचा निर्धार या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

दोन दिवसांत डॉक्टरांनी गाठले पंढरपूर पहिल्या दिवशी सायकल वारीने रूईछत्तीशी, मिरजगाव, निमगाव डाकू, करमाळा आदी गावांतून जात नगर ते शेटफळ हे १७३ किमी अंतर कापले. प्रत्येक ठिकाणी स्थानिकांनी चहा, नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. दिवसअखेर शेटफळ गावात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सर्व सहभागी वारकरी पोशाखात सायकलवरून पंढरपूरला (३० किमी) गेले. चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल मंदिरात मनोभावे दर्शन घेतले.


 

0/Post a Comment/Comments