दिल्ली - आशिया चषक हॉकी 2025 ची स्पर्धा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतातील बिहारच्या राजगीरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र याचदरम्यान आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. भारतात येऊन हॉकीचा सामना खेळण्यासाठी येण्यास पाकिस्तानच्या संघाने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकीचा सामना रद्द होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
आशिया चषक हॉकीच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह एकूण 8 संघांचा समावेश होता. परंतु आता पाकिस्तानच्या हॉकी संघाने भारतात येण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर भारताच्या हॉकी व्यावस्थापनाने दुसऱ्या देशाला आशिया चषकाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले आहे. दरम्यान, या स्पर्धेत जेतेपद पटकावणार संघ नेदरलँड आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक 2026 च्या स्पर्धेसाठी पात्र ठरेल.
भारताकडून बांगलादेशला आमंत्रण
भारताच्या हॉकी व्यावस्थापनाने सदर प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, भारत सरकार पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा देण्यास तयार होती. परंतु सुरक्षेचं कारण पुढे करत पाकिस्तान हॉकी महासंघाने भारतात येण्यास नकार दिला. पाकिस्तानने भारतात येऊन आशिया चषक हॉकीची स्पर्धा खेळण्यास नकार दिल्यानंतर भारताकडून बांगलादेशला आमंत्रण देण्यात आले आहे.
Post a Comment