महाराष्ट्रातील 'इतके' पर्यटक नेपाळमध्ये अडकले: सर्वांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न



मुंबई - राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांतील तब्बल 100 जण हिंसाग्रस्त नेपाळमध्ये अडकल्याची माहिती आहे. सरकार या सर्वांची तेथून सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळमधील उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नेपाळचा प्रवास टाळावा, तसेच सध्या जे नागरीक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. विशेषतः या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. ते म्हणाले, नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आहे.

राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खाजगी वाहनानं परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे, असे ते म्हणालेत.

आपत्कालीन मोबाईल क्रमांक जारी

आपत्कालीन कार्य केंद्राने मदतीसाठी नेपाळमधील 977-980 860 2881 आणि 977-981 032 6134 हे दोन मोबाइल क्रमांक, तर राज्यातील 91- 9321587143 व 91-8657112333 हे मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या क्रमांकांवर संबंधितांना व्हॉट्सअॅप कॉलही लावता येणार आहे.

हे ही वाचा ...

पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

'छमछम'च्या बैठकीत पुन्हा राडा; नर्तकीच्या डान्सवरून कलाकेंद्रात गोळीबार 

0/Post a Comment/Comments