खांडके गावात होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी लुटला मनमुराद आनंद, विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या खांडके गावात महिलांच्या सन्मानासाठी सरपंच सौ. चंद्रकला चेमटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य ग्रुपच्या वतीने प्रथमच होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. विजेत्या महिलांना फ्रीज, कुलर, इंडक्शन शेगडी, टेबल फॅन, मिक्सर अशी बक्षिसे देण्यात आली.  

होम मिनिस्टरचे निवेदक उद्धव काळापहाड संचलित या कार्यक्रमात महिलांनी खेळ खेळत, गाण्यांवर थिरकत आनंद लुटला. या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला.यावेळी काळापहाड यांनी महिलांना विचारलेली विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे, उखाणे, खेळ यातून वातावरण अगदी आंनदमय झाले होते.

महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. आपल्या घराला घरपण देताना हा प्रापंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम महिलांसाठी व्हावे या दृष्टीने खांडके गावात प्रथमच होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांची क्षमता ओळखून त्यांना एकत्र आणणे, त्या क्षमतेला वाव देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आजच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक माता, भगिनींच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून समाधान मिळाले. आनंद झाल्याचे सरपंच सौ. चंद्रकला चेमटे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात प्रथम क्रमांक सुवर्णा टांगळ यांना फ्रीज, द्वितीय श्रद्धा चेमटे यांना कुलर, तृतीय मनीषा टांगळ यांना इंडक्शन शेगडी, चौथे बक्षीस राणी चितळे टेबल फॅन, पाचवे स्वाती वाघ मिक्सर अशी बक्षिसे देण्यात आली. पहिले बक्षीस युवा नेते महेश झोडगे, दुसरे बक्षीस युवा नेते संदीप कर्डिले तर इतर बक्षिसे स्वराज्य ग्रुपच्या वतीने देण्यात आली. या कार्यक्रमासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनीही उपस्थित राहून गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments