अहिल्यानगर - दिवाळीच्या उत्साहात आपला मावळा ही संघटना खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक उपक्रम घेऊन आली आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात जन्मले तर या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना इतिहास आणि आधुनिक काळातील नेतृत्वगुण यांचा अभ्यास करण्याची त्यातून संधी मिळणार आहे.
ही स्पर्धा ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खुली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांचा आधुनिक समाजाशी संबंध कसा जुळवता येईल, यावर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. आदर्श नेतृत्वाची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, समाजिक बांधिलकीची जाणीव वाढवणे, स्वराज्य, धैर्य आणि न्याय यांची संकल्पना आजच्या काळात कशी लागू शकते हे समजून घेणे हा या उपक्रमामागील हेतू आहे.
या स्पर्धेचा कालावधी ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर असा आहे. दिलेल्या विषयावर हस्तलिखित ३०० ते ४०० शब्दांपर्यंत निबंध लिहावा. ई मेल किंवा पोष्टाद्वारे लिहिलेला निबंध पाठवावा. निबंध पाठविण्यासाठी ई मेल आयडी - aplamavla@gmail.com
पोष्टाने पाठविण्यासाठी पत्ता : खासदार नीलेश लंके संपर्क कार्यालय, ईगल प्राईड बिल्डिंग, चाणक्य चौकाजवळ, अहिल्यानगर ४१४००१ तसेच खासदार नीलेश लंके संपर्क कार्यालय, समर्थ कॉम्प्लेक्स, पारनेर सुपा रोड, पारनेर जिल्हा अहिल्यानगर ४१४३०२, निबंधासोबत विद्यार्थ्यांनी पूर्ण नाव, वय, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. विषयाबाहेरील किंवा नियमांचे पालन न करणारे निबंध स्वीकारले जाणार नाहीत. स्पर्धेसबंधातील अधिक माहितीसाठी ९४२२४५८४६२ व ९६३७९४३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रोख बक्षिसांसह सन्मानचिन्हाने होणार गौरव
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यास १० हजार ३३३ रूपये रोख, स्मृतीचिन्ह तसेच सन्मानपत्र, व्दितीय क्रमांकास ७ हजार ३३३ रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, तृतीय क्रमांकास ५ हजार ३३३ रूपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, चतुर्थ क्रमांकास ३ हजार ३३३ रूपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तर पाचव्या क्रमांकास २ हजार ३३३ रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खा. नीलेश लंके यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्वराज्याची संकल्पना जागवण्याचा प्रयत्न
ही स्पर्धा केवळ लेखनासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणारी, नेतृत्वगुण वाढवणारी आणि इतिहासातील आदर्शांचे आधुनिक काळाशी संबंध समजावणारी एक संधी आहे. विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी मिळेल की छत्रपती शिवाजी महाराज आजच्या जगात जन्मले असते तर त्यांनी समाजातील आव्हाने, तंत्रज्ञानाचा वापर आणि नेतृत्वगुण कसे दाखवले असते. आजच्या बदलत्या काळात स्वराज्याची, धैर्याची आणि सामाजिक बांधिलकीची संकल्पना पुन्हा जागवण्याचा हा उपक्रम महत्वाचा ठरेल. महाराष्ट्रभरातील विद्यार्थी आपला निबंध सादर करून आपल्या विचारांची साक्ष दाखवू शकतात.
Post a Comment