महाराष्ट्रात डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी



मुंबई (प्रतिनिधी) - मध्य प्रदेश-राजस्थानात कफ सिरप सेवनामुळे बालकांचे मृत्यू झाल्याने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) सतर्क झाले आहे. डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाची विक्री करू नका असे आदेश एफडीएने औषध विक्रेत्यांना दिले आहेत, अशी माहिती राज्य औषध नियंत्रक डॉ. डी. आर. गव्हाणे यांनी दिली. बाल मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या ‘कोल्ड्रिफ सिरप’च्या (समूह क्रःएस आर १३) साठ्यावर महाराष्ट्राच्या एफडीएने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या औषधात ‘डायइथिलीन ग्लायकोल’ हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, वितरक आणि रुग्णालये येथे तपासणी सुरू केली आहे.

विषारी कफ सिरपचा साठा आढळल्यास तो गोठवावा आणि त्वरित नष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले आहेत. राज्यातील अधिकारी तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत.

मुंबई-ठाण्यात अद्यापही विक्री होत असल्याचा दावा

मुंबई, ठाणे व कल्याणमधील अनेक औषध विक्रेत्यांकडून डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची विक्री होत असल्याचा दावा ऑल फूड ड्रग व लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. बुधवारी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मुंबई- ठाणे- कल्याणमधील अनेक औषध विक्रेत्यांकडे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्यांच्या औषधांची खरेदी केली यावेळी बहुतांशी विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीची विचारणा न करताच त्यांना खोकल्याच्या औषध देण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले.यावेळी त्यांनी बिलही दाखवले.

तामिळनाडूत घातक सिरपचा कारखाना सील; मप्रमध्ये आणखी १ मुलाचा मृत्यू

चेन्नई/भाेपाळ | मध्य प्रदेशात विषारी कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या बुधवारी २० वर पोहोचली. नागपूरमध्ये दाखल आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ला म्हणाले की, नागपुरात अजूनही ५ मुले दाखल आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश एसआयटीने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आणि तामिळनाडूमध्ये छापा टाकला. तपास पथक कांचीपुरम जिल्ह्यातील सुंगुवरचत्रम येथे पोहोचले, जिथे श्रीसम फार्मास्युटिकल्सचा कारखाना आहे. एसआयटी पथकाने कारखाना सील केला. तेलंगणाच्या औषध नियंत्रण प्रशासनाने गुजरातमध्ये उत्पादित रिलीफ व रेस्पिफ्रेश या दोन कफ सिरपच्या वापरावर बंदी घातली आहे.

0/Post a Comment/Comments