अहिल्यानगर - शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे उत्साहात सुरू झाली. या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि अनुप देशमुख यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, स्वप्निल भगुरकर, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे आदींसह खेळाडू, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमा (गुजरात), अनुप देशमुख (महाराष्ट्र) यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे ही स्पर्धा दर्जेदार आणि रोमहर्षक ठरणार आहे.
यावेळी अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे आयोजित या क्लासिकल फेडरेशन चेस टूर्नामेंटमध्ये सर्व वयोगटातील खेळाडू सहभागी होत आहेत. साडेपाच वर्षांचा सर्वात लहान बुद्धिबळपटू आणि ८३ वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू या स्पर्धेत आपली बुद्धी आणि कौशल्य आजमावणार आहेत.
जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा मानस म्हणजेच शहरातून जास्तीत जास्त ग्रँडमास्टर घडवणे आणि होतकरू व तरुण बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहित करणे. या दर्जेदार खेळाडू सहभागी झाले आहेत असे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर प्रकाश गुजराथी यांनी आभार मानले. जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार असून नगर जिल्हा बुद्धिबळाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
स्पर्धेत जिल्ह्यासह देशातील २७० खेळाडूंचा सहभाग स्पर्धेचे प्रस्ताविक सचिव यशवंत बापट यांनी केले. त्यांनी सांगितले की या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. आतापर्यंत अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, रायगड तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल येथून मिळून २७० खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे.

Post a Comment