नागपूर
- विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर
मुनगंटीवार यांनी रौद्ररूप धारण केलेले पाहायला मिळाले. मंत्र्यांच्या
गैरहजेरीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार यांनी सभागृहात
आक्रमक होत स्वतःच्याच सरकारला धारेवर धरले. "सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे
सोडा, हे धंदे आता बंद करा," अशा शब्दांत मुनगंटीवार
यांनी आपला संताप व्यक्त केला.
विधिमंडळ
सभागृहात अर्धा तास चर्चा सत्रात मुनगंटीवार बोलण्यासाठी उभे राहिले असता, संबंधित विभागाचे मंत्री
सभागृहात उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून त्यांचा पारा चढला.
त्यांनी तालिका अध्यक्षांना सुनावले, "मंत्री महोदयांना सभागृहात आणण्याची जबाबदारी आमची नाही, ती तुमची आहे. आमदार
उपस्थित असताना मंत्री गैरहजर राहतात हे चालणार नाही. मंत्री येत नसतील तर
त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा," अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भारत
माता माझी आई, डोके ठेवायला जागा नाही
चंद्रपूर
जिल्ह्यातील 'यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने'च्या रखडलेल्या निधीवरून
मुनगंटीवार अधिकच आक्रमक झाले. "भारत माता माझी आई, पण डोकं ठेवायला जागा
नाही," अशी
गरिबांची अवस्था झाली आहे. मुंबईत असलेल्यांसाठी सरकारकडे ११ लाख कोटी आहेत, पण आमच्या चंद्रपूरमधील
तुटक्या-फुटक्या घरात राहणाऱ्या गरिबांसाठी लागणारे ९६ कोटी ३६ लाख रुपये मिळत
नाहीत. ज्या अधिकाऱ्यांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, त्यांनी कोरड्या विहिरीत जीव दिला पाहिजे, अशा तिखट शब्दांत त्यांनी
प्रशासनाचे वाभाडे काढले.
बिरबलाची
खिचडी शिजेल, पण तुमचा निधी येणार नाही
सरकारच्या
कारभारावर टीका करताना मुनगंटीवार यांनी अस्सल म्हणींचा वापर केला. ते म्हणाले, "या योजनेचा एक हप्ता
मिळाल्यावर दुसऱ्या हप्त्यासाठी गरिबांना चातक पक्ष्यापेक्षा जास्त वाट पाहावी
लागते. मंत्री महोदय, कापूसकोंड्याची गोष्ट संपेल, बिरबलाची खिचडी शिजेल, चिऊताई दरवाजा उघडेल, पण तुमचा निधी काही येत नाही." अधिकाऱ्यांनी लिहून
दिलेली उत्तरे वाचू नका, तर निधी कधी देणार ते स्पष्ट सांगा, असा थेट जाब त्यांनी
मंत्री अतुल सावे यांना विचारला.
मंत्र्यांनी
लागलीच मागणी मान्य केली
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी
परखड शब्दांमध्ये घरकुल योजनेबाबतची आपली तक्रार मांडल्यानंतर ओबीसी मंत्री अतुल
सावे यांनी निधी लवकरात लवकर दिला जाईल असं आश्वासन दिलं. “पुरवणी मागण्यांमध्ये
या योजनेसाठी ३०० कोटी मंजूर झाले आहेत. चंद्रपूरला विहीत १०० टक्के निधी तातडीने
दिला जाईल. आपण नवीन घरकुलं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देत आहोत. पण
आधीच्या घरकुल योजनेसाठी आपण ३०० कोटींची व्यवस्था केली आहे. ताबडतोब त्यावर
कार्यवाही होईल”, असं ते म्हणाले.

Post a Comment